Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे

खान्देश! आभीर उर्फ अहिरांचा प्रदेश! सूर्यकन्या तापी , गिरणा , गोदावरीची सुपीक भूमी , चांगदेवादी संतांची भूमी , खान्देश कन्या बहिणाबाई , तर्कातीर्थ लक्ष्मण शास्त्रीची भूमी. मातृहृदयी साने गुरुजी , केशवसुत नवकाव्याचे जनक बा.सी.मर्ढेकरांची कर्मभूमी!

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव , धुळे , आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा (२३ तालुक्यांचा) प्रदेश आज खान्देश म्हणून ओळखला जातो. प्राचीनकाळी नाशिक हा प्रदेशही खान्देशातच गणला जाई. खान्देशचा आती प्राचीन , प्राचीन , मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी संस्कृतिक परंपरा आहे. ‘ आभीर देश , अहिराष्ट्र , कान्हदेश , कानदेश , खानदेश ’ अशी या प्रदेशाची भली मोठी नामावली मिळते.

श्रीकृष्णाचे बालरूप अर्थात ‘ कान्हा ’ याचा तो ‘ कान्हदेश ’ आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असल्याचे मानले जाते. काहींच्या मते कानबाई हे खास खान्देशचेच दैवत असल्याने कानबाईचा तो कानदेश आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असावा. आभीर या शब्दाचाच अपभ्रंश अहिर असून या प्रदेशाला अभिर प्रदेश ’ देखील संबोधले जाते.

अहिराणी ही खान्देशातील अहिरांची लोकभाषा-अस्मिता-आणि खास ओळख! संस्कृत साहित्यशास्त्रीनी ‘ अभिरोक्ती , अभिरी ’ म्हणून नोंद केली आहे. अभिरवाणी-अभिराणी-अहिराणी अशी तिची व्युत्पत्ती मांडली जाते. अभिरांची प्रचिनतम असा लिखित उल्लेख महाभारतात सापडतो. तोरणमाळचा अभिरराजा युवणाश्व याने पांडवांशी युद्ध केल्याचा उल्लेख आहे. महाभारताचा काळ शकपूर्व १८०० वर्षांचा मानतात. म्हणजेच सुमारे ३८०० वर्ष अहिर जाती व त्या जातींसोबत त्यांची अहिराणी ही केवळ अहिरांचीच नव्हे , तर अहिरेतर जातींची , शेतकरी-शेतमजुर , कारू-नारू , व्यापारी , आदि खान्देशच्या निम्याहूनही अधिक लोकांची लोकभाषा आहे.

अबेरियात (उत्तर सिंध प्रदेश) अभिरांची वसाहत होती.पुढे सिंध मधून खाली उतरून ते जलमार्गे कोकणात व नंतर नाशिकच्या दिशेने विस्तारत गेल्याचे अभ्यासक म्हणतात. काहींच्या मते मात्र अभिर हे पंजाब , मध्य प्रदेशातील मथुरा प्रांतातून येत येत उत्तर महाराष्ट्रात स्थिरावले असावेत. अभिरांनी महाराष्ट्राच्या वसाहती , भाषा , धर्म व सामाजिक चालीरीतींवर मोठाच प्रभाव टाकला आहे.

इ.स.२४८ मध्ये (तिसरे शतक) उत्तर महाराष्ट्र आणि त्या लगतच्या प्रदेशात अभिर सत्ता सुरू झाल्याचे उल्लेख सापडतात. ४ थ्या शतकाच्या मध्यापावेतो आभीर सत्ता होती. आभीर घराण्यातील शिवदत्ताचा पुत्र विरसेन उर्फ ईश्वरसेन या राजाने शातकर्णीचा पराभव करून काही काळ पश्चिम महाराष्ट्रीचीही सत्ता काबिज केली. अनेक अभिरराजे खान्देश आणि आसपासच्या प्रदेशात राज्य करीत असल्याचे इ.स.३-४ ते १३ पर्यंतचे सुमारे आठशे ते हजार वर्षाचे संदर्भ येतात. ईश्वरसेनाच्या राजवटीत या प्रदेशात अहिरांची बरीच वस्ती झाली. त्याकाळी अनेक महत्वाची किल्लेही अहिरांच्या ताब्यात होते. पाटण (चाळीसगाव) येथे निकुंभ वंशीय अभिरांचे राजी होते. सोन्हाडदेव या निकुंभ वंशीय राज्याचा कारकिर्दीत निजामपुर जवळील भंभागिरी (भामेर) व मनमाड जवळ अनकाई येथील जैन गुहा , पाटनची ब्राम्हण गुहा इ. लेण्या निर्माण झाल्या. भामरेच्या प्राचीन डोंगरी अशा किल्ल्यातही अभिर राजे राज्य करीत होते.

राजकीय दृष्ट्या अहिर राजवट नष्ट झाल्यावर अहिर लोक विविध व्यवसायात स्थिरावले. आणि आपले वैशिष्ट अर्थात अस्तित्व म्हणून आपल्या व्यवसायवाचक शब्दासोबत ‘ अहिर ’ हे उपपद लावू लागले. उदा. अहिर ब्राम्हण , अहिर सोनार , अहिर शिंपी , अहिर सुतार , अहिर तेली , इ. पुढेपुढे व्यवसायांमध्ये विशीष्ठ जातींची मक्तेदारी संपली आणि अहिरांकडे अहिर हे उपनावच उरले. अहिराणी या लोकभाषेवरही अहिरांचीच मक्तेदारी न राहता या प्रदेशातील इतर जातींचीही ती लोकभाषा बनली. आज मितीस ‘ अहिर ’ हे उपनाव आणि ‘ अहिराणी भाषा ’ याच अहिर संस्कृतीच्या पाऊलखुणा उरलेल्या आहेत. विविध शिलालेख , ताम्रपत्रे आदींमध्ये असणार्‍या अहिर राजांच्या उल्लेखाखेरीज अधिक माहिती उपलब्ध नाही. सुदैवाने लोकप्रतिभेतून निर्माण झालेल्या अहिराणी लोक साहित्याचे दालन मात्र अत्यंत समृद्ध आहे.

-: अहिर सोनार :-

खान्देशातील काही जातींनी आपापली जातीय बोलीही निर्माण केळ्याचे दिसून येते. उदा. भावसारी , गुर्जरी , लेवा , भिल्ली , इ. अहिर सोनारांचीही ‘ सोनारी ’ ही खास अहिर जातीय बोली आहे. तथापि , या सुंदर जात बोलीला अखेरची घरघर लागली आहे. आपल्या सोनारी बोलीचा आपल्या व्यवसायात सांकेतिक वापर करता यावा म्हणून इतरांना ती कळताकामा नये याची काळजी (गुप्तता) घेण्यात आली! जुन्या जाणत्यांची अशी संकुचित दृष्टी आणि नव्या पिडीचा या बोली बाबत फारसा प्रचार-प्रसार झाला नाही. परिणामी तिला प्रादेशिक प्रतीष्ठाही लाभली नाही. आज सोनारी बोलीचे अस्तित्व मूठभर जांणकारांपुरतेच मर्यादित आहे. नवतरून पिढीतर काहींना सोनारी ही एक स्वतंत्र जात बोली असल्याचे माहीत देखील नाही ही खेदाची बाब आहे. सोनारी बोलीच्या तुलनेत खान्देशात काही अन्य जातबोली बर्‍यापैकी टिकून आहेत. उदा. गुर्जरी , भावसारी , भिल्लोरी इ.

खान्देशात अहिर सोनार जातीचे अस्तित्वही इथल्या एकूणच अहिर जाती प्रमाणे प्राचीन आहे. अहिर सोनार जातीने बरेचसे चढाव उतार पाहीले. अस्तित्वासाठी प्रचंड संघर्ष केले. मोरारजींच्या काळातील सुवर्ण नियंत्रण कायद्याने या जातीच्या व्यवसायावर मोठा आघात केला. अनेक देशोधडीस लागले. काहींनी नोकर्‍या पत्कारल्या काही स्थलांतरित झाले. तर काहींनी आपला व्यवसाय कसाबसा टिकवून धरला. तथापि आज चित्र बदलते आहे. आजच्या विज्ञानयुगात ‘ विश्वग्राम ’ ही संकल्पना उदयास आली आहे. इंटरनेट , प्रगत संपर्क माध्यम प्रगत दळणवळण काळानुरूप बदलते व्यवसाय , व्यवसायात जातींची संपलेली मक्तेदारी , आदि बाबींमुळे अहिर सोनार जातही बरीच प्रगत झाली आहे. तिचे अस्तित्व केवळ खान्देशपुरते सीमित नसून ती आज रोजगार , व्यवसायादी कारणांनी संपूर्ण महाराष्ट्र , कोकण , गुजराथ , मध्य-प्रदेश , उत्तर प्रदेश , आदि राज्यांमध्ये विखुरली आहे. नवशिक्षित पिढी तर सातासमुद्रापार थेट युरोप-अमेरिका जाऊन धडकली आहे. पारंपरिक धंद्याखेरीज अनेक नवनव्या व्यवसायातही अहिर सोनार आघाडीवर आहेत. काहींनी विविध सेवाभावी संस्था उभारल्या तर काही राजकारणात सक्रिय होऊन प्रतिष्ठित पदावर विराजमान आहेत. सरकारी , निमसरकारी , खाजगी , औद्योगिक क्षेत्रातील नोकर्‍यांमध्येही काही उच्चपदस्थ आहेत. तर काही स्वत:च उद्योगपती आहेत. बदलत्याकाळानुरूप प्राप्त परिस्थितीनुरूप प्राप्त संधिनुसार अहिर सोनार आपल्या प्रयत्नांनी , जिद्दीने , चिकाटीने आपले अस्तित्व भक्कमपणे टिकवून आहेत .

आजच्या भौतिक युगात जातीय विचार हा वरवर संकुचित अनुचित व अनावश्यक वाटतो. पोटजातीभेद नष्ट होत आहेत. काही प्रमाणात अंतरजातीय विवाह देखील होताना दिसतात. त्यामुळे जात ही संकल्पना किती दिवस कुरवाळत बसावी ? असाही प्रश्न पडतो. पण खास जातीच्या म्हणून असणार्‍या काही समस्यांच्या निवारणार्थ आणि आपल्या जाती समुहाच्या विकासार्थ सर्वच जाती पोटजातींची नवनवी मंडळेही देशभरात नित्य उदयास येत आहेत! नवे युग काही नवनव्या समस्याही घेऊन येत असेत. त्यावर उत्तर म्हणून नवनवेच मार्गही शोधणे क्रमप्राप्त ठरते. शिवाय स्वातंत्र्योत्तर लोकशाहीत राज्यकर्त्यांनाही आपल्या सत्ताकारणासाठी व्होटबँक म्हणून जातीव्यवस्थेला अधिकच मजबूती देण्याचे काम केले. त्यामुळेच आज प्रत्येक जातीला आपल्या एकीचे बळ ध्यानी येवू लागले आहे. जातीय सामाजिक ऐक्य ही प्रत्येक जातीला काळाची गरज वाटू लागली आहे. विविध जात समूह एकत्र येत आहेत. जगाच्या तुलनेने आपण कुठे आहोत हे समजून घेत आहेत. आत्मपरीक्षण करीत आहेत. अहिर सोनार समाजही असाच जागृत झाला असून ग्रामीण शहरी भागात या समाजाची विविध मंडळे उदयास येत आहेत.

 

 

 

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com