Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)
विविध पूजा
साखर चौथेचे ताट :-
काशाच्या ताटात साडे तीन पुरणपोळीचे एकेक जुळगा असे सात जुळगे घेणे, ताटात ठेवणे, साडेतीन वाटी गुळाची किंवा साखरेची खीर ताटात घेणे व त्यास साखर म्हणणे. पुरण पोळीवर नगिणीचे पाने ठेवून त्यावर कुलदेवतेची माळ ठेवावी व दिवा लावावा नऊ मोदक करावे. हरबर्याची भाजी करावी. हरबर्याचा डाळीचे फुनके करावे व ते ताटात ठेवावे. नंतर तुपाची धार ताटापासून ते चुलीपर्यंत नेणे. चुलीची/गॅसची पूजा करावी. नंतर ताटाभोवती सर्व भाऊबंदानी बसून चंद्र निघाल्यावर ताट भरावे. स्वयंपाकात पुरणपोळी, खीर, हरबर्याची भाजी, भात करावा (या दिवशी तुरडाळ वापरीत नाही) या दिवशी उपवास करावा.
कानबाईचे रोट :-
हे रोट श्रावण महिन्यात पंचमी झाल्यावर आठवड्याच्या पहिल्या रविवारी करतात. अडीच अगर पाच शेर गहू भाऊबंदकीची, प्रत्येक माणसी पाच किंवा एक मूठ गहू घेणे( मुले व माणसे यांच्या नावाने एकाने मूठ काढली तरी चालते) एकत्र दळून पीठ करणे. खोबर्याच्या वाटीच्या एक दिवा असे तीन दिवे करणे. पावशेर किंवा आतपाव कणकेचे दिवे करणे) त्यात फुलवात लावून पहिल्या दिवशी सार, भात व पुरणाच्या पोळ्या करणे. रोटाच्या पोळ्या कानबाईसमोर ठेवून त्यावर नागिणीचे पाने ठेवून त्यावर कुलदेवतेची माळ ठेवून दिवे लावून कापुर व अगरबत्ती पूजा करणे. कानबाईच्या आजूबाजूस पाच फळे ठेवणे, डोक्यावर पाच खोबरे वाटीचे तोरण बांधणे. कानबाईच्या तांब्यात सव्वा रुपया व अख्खी सुपारी टाकणे. चौरंगास केळीचे खांब बांधणे. दिवे माणसे व स्त्रिया भाऊबंदकी यांचे जेवण होईपर्यन्त जळू देणे. उरलेले रोटाचे पीठ पौर्णिमेच्या आत भाऊबंदानी संपवावे. इतर पाहुण्यांना रोटा व्यतिरिक्त स्वयंपाक करून जेवू घालावे. कानबाईचे नारळ एका तांब्यावर व मुखवटा एका तांब्यावर ठेवावा व दोन्ही दागिन्यांनी सजवावे. दुसर्या दिवशी आरती करून वाजत-गाजत नदी किंवा तलावात न्यावे. तेथे कानबाईला अंघोळ घालुन पूजा करून, केळीचे खांब, फुले, पूजा विसर्जित करावी व कानबाईला सजवून घरी आणावी
लग्नाचे ताट :-
काशाच्या ताटात किंवा परातीत अडीच पावशेर किंवा सव्वा शेर तांदूळाचा भात घेणे. त्यावर दही, दूध, गूळ, साखर टाकणे त्यावर नागिणीचे पाने ठेवून त्यावर कुलदेवतेची माळ ठेवावी. हरबर्याची भाजी, व हरबर्याच्या डाळीचे फुणके करून ते सर्व त्यात ठेवून त्यावर साडेतीन धार तुपाची मध्यापासून बाहेरपर्यंत फिरवणे. आरती करून भाऊबंदानी एकत्र बसून खावे. लग्नाच्या आधी कोणत्याही एका शुक्रवारी हे करावे. मुलाच्या लग्नाआगोदर करावे. उरलेले हात धुण्याचे पानी समुद्रात टाकावे. (फुणक्यात तिखट न टाकता मिरे बारीक करून टाकावे).
अष्टमीची आरती कुळ धर्म :- ( ही वर्षातून तीन वेळा करवयाची असते. )
१)माघ शु. अष्टमी २)श्रावण शु. अष्टमी ३) चैत्र शु. अष्टमी या दिवशी पुरण पोळीचा स्वयंपाक करावा. दुध, तूप, गूळ, गव्हाचे पीठ घालून कणीक भिजवावी. त्याचे आठ दिवे करावे. पाच गोट्या, पाटा-वरवंटा, लाटणे पोळपाट, विचु, विट्टी दांडू, करंडा, रतवदूतल, वेणी, फणी करावे. करंडा बनविताना त्यात पाच तांदूळ, गूळ, तूप टाकून नंतर झाकण बंद करावे. हे सर्व उकळून घ्यावे. उकळलेले पानी खिरीत किंवा समुद्रात टाकावे. एका ताटात केळीच्या पानावर किंवा नागिणीच्या पानावर हे सर्व दिवे व बनविलेल्या वस्तु व्यवस्थित मांडाव्यात. त्या ताटात मध्यभागी नागिणीच्या पानावर देवीची माळ ठेवुन पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून सर्व दिवे पेटवून आरती करावी. ते ताट त्या दिवशी दिवे विझल्यानंतर झाकून ठेवावे. व दुसर्या दिवशी सर्व एकत्र करून दूध टाकून प्रसाद म्हणून खावे. हात धुतल्यानंतर पानी व उरलेली पूजा जमिनीत खड्डा करून ( समुद्रात ) टाकावा.
जाऊळ व शेंडी :-
पहिला मुलगा/मुलगीच्या वेळेस चैत्र शु. अष्टमीला देवी जवळ किंवा देव्हार्याजवळ मुलाचे जाऊळ देण्याची परंपरा आहे. त्यावेळेस देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवून आरती करावी व मुलाची शेंडी ही देवी पुढे देण्याची परंपरा आहे. मुलाची शेंडी ही चैत्र शु. अष्टमीला देतात. त्या वेळेला मुलाच्या आईची संपूर्ण केस किंवा अंबाडा (जुडा) कुलदेवतेसमोर द्यावा लागतो. त्या वेळेस कोणीही निंदा करू नये किंवा हसू नये. शेंडी दिल्यानंतर बकरा (काळा रंग सोडून) भैरवाच्या पायाजवळ बळी दिला जातो. बकर्याची मुंडी देवीच्या पायाजवळ ठेवून त्यावर कणीकेचा दिवा लावावा लागतो. हे सर्व परंपरेनुसार करतात. आता कोणी गोड स्वयंपाकही करतात.
व्रताची आरती :-
ही आरती भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या आठवड्यात केव्हाही करतात. मध्ये कणीकेचे १० दिवे करून व एक पुरणाचा भंडारा तयार करणे व त्यात एक साधी पोळी त्यावर खीर ठेवून ताटात कृष्ण व गणेशाची मूर्ती ठेवणे व पूजा करून आरती करणे. व व्रतास (सूती दोरा) सहा गाठी मारणे. चार गाठी सोडणे व दोन राहू देणे. पूजा करून नैवेद्य आरती खीर बरोबर खाणे. कुलदेवतेची याप्रमाणे सर्वांनी कुळाचार व कुळ धमृ नित्य नियमाने उपासना, आराधना, प्रार्थना, व यथासांग पूजा करावी व आपल्या कुलदैवतास प्रसन्न करून घ्यावे. श्रीराज राजेश्वरी कुलस्वामिनी विंध्यवासिनी बिजासनी माता की जय II
![]() |









