Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

चक्रपुजा –मिती आश्विन शुद्ध अष्टमी

श्री चक्रपुजा म्हणजे श्री यंत्र पूजा, यात उडीद, पांढरे तांदुळ, लाल तांदुळ वैगरेचे गोल चक्राकार वर्तुळ ठराविक आकारात बनवून त्यांचे पूजन करावे. उडीद म्हणजे श्री महालक्ष्मी स्वरूप. पांढरे तांदुळ म्हणजे श्री महसरस्वती स्वरूप वर तिन्ही महाशक्तींचे पूजा या अर्थाने धान्याचे गोलाकार चक्र मांडून पूजा करावी. विश्व चक्रारचे चार दरवाजे करावेत. ही पुजा दरवर्षी करतात किंवा दोन, पाच, दहा, पंधरा, पंचवीस वर्षाच्या अंतराने ही चक्रपुजा करता येते. या चक्रपूजेस सर्व भाउबंधाना बोलवायचे असते.

साहित्य:- उत्तम गहू १० किलो, तांदूळ १० किलो, मूग १ किलो, उडीद २ किलो, हरबरा २ किलो, साखर २ किलो, गूळ १ किलो, तूप (साजूक)२ किलो, दूध १० लिटर, दही ६ लिटर, तेल ३ किलो, दाथरा (साळीचा पुळा अथवा पाचोळा), आंब्याचे लाकूड, चकमक (पोलाद व गार अथवा सूर्यकाच किंवा काडेपेटी), पीठ १ किलो, नवीन चूल, नारळ ४.

इतर साहित्य:- केळीचे पाने, नागवेल ५० पाने, आंब्याची पाने, आंब्याच्या डहाळ्या ४, सूतळी, नागफणीचे खिळे १५.

पूजा साहित्य:- भुई कोहळा १, तलवार, लिंबू २५, कुलस्वामिनीचा फोटो, चौरंग, १ मि. लाल कापड/मद्रा, समई, आसन, निरंजन, लाल कन्हेरीच्या फुलांची माळ.

आसरा पूजा साहित्य:- सात टिकल्या, नाडा, सात बांगड्या, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फणी, करंडा, ऊद, कापुरवडी १.

कळसासाठी साहित्य:- तांबाचा तांब्या, नागवेल पाने, नारळ १, सुपारी, गुळखडा, सुटे पैसे.

म्हसोबा पूजा साहित्य:- सरकी, ढेप, अंडे १.

ज्योत लावण्यासाठी:- भीमसेनी कापुर १ डबा, निरंजन (शुद्ध तुपाचे)देव पळ्याचा कापूस.

साहित्य:- देव पळ्याच्या काड्या ३, सनकाड्या ३.

होमासाठी साहित्य:- होम पुडा, होम काड्या, (सर्व प्रकारच्या फळांच्या, फुलांच्या व झाडांच्या वाळलेल्या काड्या) नारळ १, गहू.

मेढया व वर्‍हाडी तयार:- मेढया १ व वर्‍हाडी १० एकूण नग ११-गव्हाची कणीक, पंचामृत (दूध, तूप, मध, साखर, व दही), नवीन

करण्यासाठी साहित्य:- चूल, आंब्याचे लाकूड, चकमक (पोलाद व गार किंवा सूर्यफूल किंवा काडेपेटी), सनकाडया, दाथरा(ऊसाची पानड आगर साळीचा पुडा), मेढया-वर्‍हाडी (फक्त पुरुषांनीच तयार करावा).

ताट साहित्य:- प्रथम जेथे ताट भरवायचे ती जागा गाईच्या शेणाने सारवावी. व वरुण किंचित गोमूत्र शिंपणे, कंपास व खडू, तांदूळ, गुलाल मिश्रित तांदुळ, मूग, उडीद, जाड मिठ, करंजी नग ११, पोळ्या ११, गोड पापड्या ११, उडदाचे वडे ११, सांजर्‍या ११, मेढया १, वर्‍हाडी १०, एकूण ११ नग, खीर, फळे ११ प्रकारची व प्रत्येकी ११ फळे उदा, मोसंबी ११, डाळिंब ११, सफरचंद ११, लिंबू ११, सिताफळ ११, बदाम ११, सुपारी ११, खारीक ११, उसाचे पेरे ११, खोबर्‍याचे तुकडे ११, हळकुंड ११, गुलाल.
ज्योत विसर्जन:- सनकाडया अगर देवपळाच्या कापराच्या वाळलेल्या काडया २.

साहित्य:- देव पळ्याच्या कापूस, साजूक तूप, पोळी, चाकू.

ताट भरावयासाठी विधी व त्या दिवशी पाळावयाचे नियम:-

१) ज्या घरात ताट भरवायचे ते घर सारवून स्वच्छ करणे. २) ताट भरवायची जागा गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. ३)सुवासिनीने डोके धुवून घरीच गहू दळावेत. ४) ताट भरवायचे ठिकाणी असलेली व्यक्ति काही कारणास्तव बाहेर गेली व नंतर ती परत त्या ठिकाणी आल्यावर तिच्या अंगावर गोमूत्र शिंपडावे. ५)ताट भरणार्‍यापैकी कोणास नैसर्गिक विधीसाठी आवश्यक असल्यास त्या व्यक्तीने स्नान करून ताटाच्या ठिकाणी यावे. ६) पुरुषांनी उजव्या हातात दावीचा नाडा राखी प्रमाणे बांधावा. दुसर्‍या दिवशी समुद्र विसर्जन करताना त्यात तो नाडा टाकावा. ७) मेढ्या वर्‍हाडी फक्त पुरुषांनीच तयार करावा. ८) दुसर्‍या दिवशी ताटाचा प्रसाद फक्त अविवाहित मुली व भाऊबंद यांनीच राखावा. ९) कच्ची फळ, उष्टे अन्न, उरलेले अन्न, जे आपण खाऊ शकत नाही ते समुद्रात टाकावे. १०) समुद्र विसर्जन दुसर्‍या दिवशी म्हणजे नवमीस सूर्यास्ताचे आत करावे. ११) ताटाचे दिवशी (अष्टमीस) सर्वांचे जेवण होईपर्यंत मेढ्या व वर्‍हाडी यांच्यातील वाटी साजूक तुपाणे तेवत ठेवाव्यात. १२) देवी जवळील समई अष्टमीस देवाची स्थापना झाल्यापासून लावावी. ती दुसर्‍या दिवशी समुद्र विसर्जन होईपर्यंत तेवत ठेवावी. १३) ज्योत लावताना डावा पाय उंच म्हणजे फक्त उजव्या पायावरच उभे राहावे (फक्त एका पायावर) १४) ताटाचा प्रसाद घेण्याच्या दिवशी म्हणजे नवमिस सोमवार, गुरुवार, शनिवार, या सारखे उपवास, मोडावेत व प्रसाद घ्यावा. १५) कळसावरील नारळ दुसर्‍या दिवशी समुद्र विसर्जन करताना फोडावे. १६) स्त्रियांनी जेवणानंतर देवीस झेंडूची फुले वाहून गाणी म्हणवीत. ताटाचे ठिकाण डाव्या बाजूस कोपर्‍यात चौरंगावर नवा लाल मद्रा (कापड) टाकून कुलस्वामीनिंचा फोटो ठेवावा. देवीची पूजा करून लाल कन्हेरिची फुले वाहावीत. देवी समोर तांब्याचा कळस ठेवावा. त्यात पानी असावे. ५ विडयाची पाने ठेऊन वर नारळ ठेवावे. त्या शेजारी ५ विडयाची पाने त्यावर सुपारी, गुलचा खडा, सुट्टे पैसे ठेवावेत. साधारण: २.३० ते ३.०० वाजेपासून मेढ्या व वर्‍हाडी तयार करण्यास बसावे व त्याच वेळेपासून काहींनी चक्राची आखणी करावी.

चक्र भरण्याआधी एक मूठ तांदूळाची स्वस्तिक काढणे. पांढरा तांदूळ घ्यावा. पुढील चक्रासाठी एक ओळ लाल तांदळाची एक ओळ पांढर्‍या तांदळाची, अशा प्रकारे नऊ गोल चक्राकार ओळी झाल्यावर दहाव्या ओळीला चार दरवाजे करणे. प्रत्येक दरवाज्यात खालील प्रमाणे चित्र काढणे.

पूर्व दिशेला : लाल तांदळाचा बारा किरणांचा सूर्य काढणे. पश्चिम दिशेला : पांढर्‍या तांदळाचा अर्ध चंद्र व चांदनी काढणे.

उत्तर दिशेला : उडीदाचा (उडीदाला मोती म्हणतात) गदाधारी मारुती काढणे. दक्षिण दिशेला : मिठाचा राक्षस व समुद्र काढणे.

स्वस्तिक वरील क्रम : नागवेल पान, गोड पापडी, सांजरी, वडे, करंजी- खीर, वर्‍हाडी किंवा मेढ्या, मेढ्याचे सभोवर ताटावर नागवेल पानावर वरील प्रमाणे वर्तुळाकार १० वर्‍हाडी ठेवणे प्रत्येकाचे शेजारी प्रत्येक प्रकारचे १ फळ ठेवणे देव्हार्‍यातल्या देवीच्या माळा प्रथम पाण्याने, नंतर दुधाने व पुन्हा पाण्याने धुवाव्यात. नंतर त्यांची पूजा करून त्या मेढ्याच्या कमरेस बांधाव्यात.

मेढ्या व वर्‍हाडी तयार करताना जी चूल पेटेल त्या विस्तवावर १ निरंजन (तुपाचे) लावून ठेवावे. मेढ्याच्या मध्यभागी उंचवटा आहे. त्यावर देवपळ्याच्या कापसाची (कारेडी) काडी खोचावी. त्या काडीवर देव पळ्याच्या कापूस लावावा. व त्यालगत भीमसेनी कापुर ठेवावा. खोल भागात तूप टाकावे भिंती वरील आसरा व म्हसोबाची पूजा करावी (भिंतीवर रोलमिश्र शेंदूराने आसरा व म्हसोबा काढावा.) नाड्याने बांगड्या २ खिळे ठोकून बांधवा. (नंतर दोन सनकाड्या अथवा देवपाळाच्या काड्या) घेऊन त्यास देवपळाच्या कापूस गुंडाळून त्यास शुद्ध तुपास भिजवून त्यावर असलेली निरंजनीने कापसाचा भाग पेटवावा व १ ते २ फुट उंचीणे उजव्या पायावर उभे राहून जळत्या तुपाचे थेंब मेढ्यावर पडू द्यावेत म्हणजे कापुर पेट घेईल. व त्या बरोबर मेढ्याला खोचलेला कापूस पेट घेईल त्यालाच ज्योत लागणे असे म्हणतात. ज्योत लागल्याबरोबर सर्वांनी “बोल अंबे माता की जय हो, जय हो” “कुलदेवतेचा जयजयकार”. असा घोष करावा. नंतर त्याच दोन काड्यांनी वर्‍हाडीच्या वाटी पेटवावया नंतर त्या जळत्या काड्या एका पोळीत जमिनीवर ठेवून चाकू खोचावा. महत्वाचे म्हणजे मेढ्याची ज्योत जळते वेळी दारे खिडक्या बंद कराव्यात. भाऊबंदाशिवाय कोणास उपस्थित राहू देवू नये. कारण दुसर्‍याला ज्योत लावत्या वेळी पाहू देत नाही. ज्योत लावल्यावर दारे खिडक्या उघडणे व आपण पुजा करून नंतर दुसर्‍यानाही पूजा करू देणे. मेढ्याची ज्योत लावल्या नंतर बाकी वर्‍हाडांच्या ज्योति लावाव्यात. नंतर एका लहान मुलीस भवानी करून पूजा करावी.

कुमारिका : कुमारी मुलगी ५ वर्षाच्या आतील बसवावी. तिची पूजा करणे तिचा भांग गुलाल कुंकुवाने भरणे. तिला दूध, भात, गूळ, तूप, (साजूक) खाऊ घालणे. (ज्योत लागल्यानंतर व तिचे विसर्जन झाल्यावर) तिला दक्षणा देणे. सर्वांना ताटाची पूजा केल्यावर कुमारिका झालेल्या मुलीच्या उजव्या पायाचा अंगठा पाण्याने स्वच्छ धुवावा नंतर एका वाटीत थोडे दूध घेवून त्यात तिचा धुतलेला अंगठा बुडवावा व नंतर ते वाटीतून प्रत्येकास कुमारिका प्रसाद म्हणून रुमाल झाकून द्यावा. दूध पिणार्‍याने आपल्या इच्छेप्रमाणे पैसे एका ठिकाणी जमवावेत ते दुसर्‍या दिवशी दूध, दही, तूप या साठी खर्च करावेत.

होमकुंड पेटवावा त्यात फळाफुलांच्या कोरड्या काड्या जाळाव्यात. पूजा करून एक नारळ व चुलीतील विस्तव टाकावा भोईकोहळा ठेवावा, त्याची पुजा करावी व तलवारीची पण पुजा करावी. तलवारीच्या टोकाला लिंबू खोचावा. व तलवारीने वार करून कोहळा शेवटपर्यंत कापले जावे (दोन तुकडे अलग होऊ नयेत) कापले गेलेल्या भागावर शेंदूर टाकावा. व त्यावर कणकेचा दिवा ठेवावा. या दिव्यास ४ ही बाजूने वाटी पेटवाव्यात. सर्वांनी ताटाची पूजा करून देवीची आरती म्हणावी. कुमारीकाच्या दुधाचा प्रसाद झाकलेल्या वाटीतून घ्यावा व याच वाटीत गुप्तदान टाकावे.

सर्वांचे जेवण होईपर्यंत वर्‍हाडीच्या ज्योति साजूक तुपाणे तेवत ठेवाव्यात. जेवणानंतर स्त्रियांची देवीसमोर नमस्कार करतील. नंतर मोठ्या पातेल्याखाली ताट झाकले जाईल. दुसर्‍या दिवशी स्नान झाल्यावर लाल तांदूळ वेगळे निवडून स्वच्छ धुवावेत. व सर्व तांदळाचा भात करावा. उडीद मुगाचे मेदगे (भाजी) करावी. मेढ्या व वर्‍हाडी यानुसार बारीक चुरमा करावा. नंतर भात व चुरम्यासाठी दूध, तूप, यांच्या वापर करून प्रसाद घ्यावा. उपवासवाल्यांनी उपवास मोडून देवी प्रसाद घ्यावा. सोबत फळांचा प्रसादही घ्यावा.

सर्व झाल्यावर चक्राच्या खाली दक्षिणेला होम तयार करावा. होम काड्यांनी पेटवावा. होम पूजा तूप, दही, मध, तीळ, राळा, जव, तसेच भोर कोळ, लिंबू काढून पूजा करावी. उष्टे, कच्ची फळे, खाण्यास योग्यत नसलेला प्रसाद, कोहळे, विसर्जनाची पोळी मिठाच्या समुद्रात टाकावे व समुद्राची पुजा करून नारळ फोडावे. शेवटी समुद्रात उरलेली माती समुद्रात विसर्जन करावी. समुद्र विसर्जन सूर्यास्ताचे आधी व्हावे. ३ नारळ १ होमात न फोडता २ देवीजवळ तांब्याच्या तांब्यावरचे ३. ताटाची पूजा झाल्यावर फोडावे व प्रसाद सर्वांनी घ्यावा.

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com